Site icon लोकाशा-बंब न्यूज

अतिवृष्टीने पीक वाया, शेतकऱ्याची आत्महत्या

बीड : अतिवृष्टीमुळे शेतीसह पीक वाहून गेले. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सिरसमार्ग (ता. गेवराई) येथे १ ऑक्टोबर रोजी घडली. अतिवृष्टी नुकसानीचा हा जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे.
भाऊसाहेब दशरथ पांढरे (५५, रा. सिरसमार्ग, ता. गेवराई) असे मयताचे नाव आहे. ते अल्पभूधारक होते. घर बांधणीसाठी त्यांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते, शिवाय सेंट्रल बँकेचे पीककर्जही घेतले होते. शेतात त्यांनी सोयाबीन व कापसाची लागवड केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे पिकासह शेती खरडून वाहून गेली. त्यामुळे अतोनात नुकसान झाले. या नैराश्येतून त्यांनी १ ऑक्टोबर रोजी दुपारी घराजवळील पत्र्याच्या शेडमागील सुबाभळीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात याची नोंद नव्हती.
….
बँकेतून येताच घेतला गळफास

नवीन कर्ज मिळावे यासाठी भाऊसाहेब पांढरे हे बँकेत खेटे मारत होते. मात्र, जुने कर्ज थकीत असल्याने बँकेने नवीन कर्जास नकार दिला होता. गुरुवारी दुपारी बँकेतून येताच त्यांनी गळफास घेतला. मादळमोही चौकी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे दिला.
….

Exit mobile version