Site icon लोकाशा-बंब न्यूज

राज्यात नवरात्रोत्सवामध्ये गरबा घुमणार, टोपे यांची मोठी घोषणा

‘नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यास परवानगी आहे पण गरबा खेळताना सामाजिक अंतर पाळणे व मास्क वापरणे अतिशय गरजेचे आहे’, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रात मात्र गरबा आयोजनास एका आदेशाद्वारे पालिकेकडून मनाई करण्यात आलेली आहे.  
कोविड स्थितीमुळे राज्यात गेल्यावर्षी नवरात्रोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला होता. प्रत्यक्ष दर्शनास तसेच गरबा खेळण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली होती. यंदाही नवरात्रोत्सवासाठी स्थानिक पातळीवर प्रशासनांकडून नियमावली जारी करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा गरबा खेळता येणार का, याकडे गरबाप्रेमींचे लक्ष लागले आहे. अशा सर्वांसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आनंदाची बातमी दिली आहे. अटी आणि शर्ती पाळून गरबा खेळता येईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचा उल्लेख करत राजेश टोपे यांनी गरबा खेळण्यास मान्यता देण्यात आल्याचे नमूद केले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्रालयातील सचिव सौरभ विजय यांना मी बोललो आहे. त्यात निश्चितपणाने सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून गरबा खेळण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. साधारणपणे तीन ठिकाणी गरबा खेळला जातो. मोकळी मैदाने, सभागृह आणि बंद हॉल अशा ठिकाणी गरब्याचे आयोजन होते. यात मोकळ्या मैदानामध्ये सामाजिक अंतर पाळणे आणि मास्कचा वापर सक्तीचा असेल तर हॉल किंवा सभागृह असल्यास त्याठिकाणी एकूण क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच परवानगी देण्यात यावी व कोविडचे अन्य नियम पाळले जावेत, अशी अट संबंधितांवर असेल, असे टोपे यांनी पुढे नमूद केले.
बंदिस्त ठिकाणी गरबा आयोजित केल्यास व तिथे कॅटरिंग सेवा दिली जात असल्यास जे कर्मचारी असतील त्यांनी कोविडवरील दोन्ही लस घेतलेल्या असाव्यात. त्याचे प्रमाणपत्र त्यांच्याजवळ असणे बंधनकारक असेल. यासोबतच जी काही मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आलेली असतील त्याचे पालन करणे आवश्यक असेल, असेही टोपे यांनी सांगितले. नवरात्रीत आदिशक्तीची पूजा, आराधना केली जाते. दसर्‍यापर्यंत हा उत्सव चालेल. या उत्सवात गरबा तसेच अन्य कार्यक्रमांतही मास्कसक्ती असेल. अटी शर्तींच्या अधीन राहूनच सर्व काही करता येईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version