गेवराई , दि. 29 (लोकाशा न्यूज) : गेल्या दोन दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे पुल ओलांडत असतांना एक तरूण पाण्यात वाहून गेल्याची घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव याठिकाणी घडली होती. याच ठिकाणी बुधवारी जिल्हाधीकारी राधा बिनोद शर्मा यांनी भेट दिली व मयताच्या पत्नीला स्पॉटवरच चार लाखांचा धनादेश दिला. रस्ता नसल्याने जिल्हाधिकारी चक्क ट्रॅक्टरमध्ये बसून भोजगावात पोहचले.
सुदर्शन संदिपान संत ( वय 34 वर्ष ) राहणार भोजगाव तालुका गेवराई जि. बीड हा तरूण रस्ता क्रॉस करत असतांना पाण्यात पडला व वाहून गेला होता. दोन वर्षापासुन याठिकाणचा पुल अर्धवट आहे, त्यातूनच हि दुर्घटना घडल्याने गावकर्यांनी धोंडराईच्या राष्ट्रीय महामार्गावर मृतदेह ठेऊन चार तास ठिय्या अंदोलन केले होते. त्यानंतर तहसिलदारांनी जिल्हाधीकार्यांना फोनवरून माहिती दिली व जिल्हाधीकारी व स्थानिक लोकप्रतिनीधी यांच्या विनंतीला मान देऊन सदरचे अंदोलन गावकर्यांनी थांबविले होते. बुधवारी घटनेच्या दोन दिवसानंतर स्वत; जिल्हाधीकारी राधा विनोद शर्मा यांनी भोजगावला भेट दिली गावांत जाताना त्यांनी टॅक्टरचा प्रवास करत भोजगाव गाठले. गावकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच मयताच्या पत्नीला चार लाखांचा धनादेश दिला. संबंधीत पुलाचे काम लवकर पुर्ण करण्या संदर्भातल्या सुचना प्रशासनाला दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधीकारी नामदेव टिळेकर, प्रभारी तहसिलदार रामदासी, मंडळ अधीकारी बाळासाहेब पखाले, तलाठी राजेश राठोड, यांच्यासह अनेक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.