बीड ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नेहमीच सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू ठेवून योजना राबवल्या आहेत. देशातील अल्पसंख्यांक समाजासाठीही अनेक मोठ्या योजना राबवण्यात येत असून या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील वढवणी येथील नगरसेवक इस्माईल पठाण यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचा युवा जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पठाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहांगिर , भाजप संघटन सरचिटणीस प्रा.देविदास नागरगोजे सर, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हाजी जे. डी. शाह साहेब , बाबरी सेठ मुंडे, राम भाऊ कुलकर्णी,उषाताई मुंडे आदींची उपस्थिती होती. यावेळी पंकजाताई म्हणाल्या , केंद्र सरकार अल्पसंख्यांक समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. नाविन्यपूर्ण योजना राबवून प्रत्येक घटकापर्यंत त्या पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामान्य कार्यकर्ता हीच भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. काम करणाऱ्या प्रत्येकाची दखल या ठिकाणी घेतली जाते. अल्पसंख्यांक समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.