अंबाजोगाई /प्रतिनिधी:
सोमवारी रात्रभर पाऊस सुरू असल्याने व मांजरा धरणाच्या वरच्या पट्यात मुसळधार पाऊस झाल्याने. मांजरा धरणाचे सर्वच गेट उघडले आहेत. यामुळे मांजरा धरणाच्या खाली असलेल्या गावात पाणी घुसले आहे. मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे अर्धे आपेगाव पाण्यात गेले आहे. पुराच्या भीतीने नागरिकांनी रात्र जागून काढली.
मांजरा नदीच्या खाली असलेले सौंदाणा, इस्थळ, अपेगाव, तटबोरगाव, धानोरा खुर्द, अंजनपूर, कोपरा, देवळा हे गावे प्रभावित झाली आहेत. या गावात पाणी घुसल्याचे चित्र दिसून येत आहे. आपेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना व वीज उपकेंद्रात पाणी घुसले आहे. तसेच या भागात राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये ही पाणी घुसले आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पूर येईल या भीतीने नागरिकांनी रात्र जागून काढली.
“आपेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 हा पूर्णपणे पाण्यात आहे. यामुळे दवाखान्यातील रेकॉर्ड, साहित्य, नायट्रोजन व इतर सर्व द्रवनत्र पात्र खराब झाले आहे. आपेगाव येथील सर्व पशु पालकांना सुचित करण्यात येते की आपली जनावरे शेतात न बांधता आपल्यासोबत घरी घेऊन यावेत.”
- डॉ. बी. एस. कोकणे
( पशु वैद्यकीय अधिकारी, आपेगाव)