औरंगाबाद, दि. 17 (लोकाशा न्यूज) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात भाजप नेत्यांचा भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यानंतर युती झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील का? असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मला कानात सांगितलं. तुम्ही मुंबईत या, आपण दोघे मिळून चर्चा करू, असं रावसाहेब दानवे म्हणाले. दानवे यांनी केलेल्या या सूचक विधानामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी युती झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार का? मुख्यमंत्र्यांनी तुमच्या कानात काय सांगितलं? असा सवाल त्यांना करण्यात आला. मुख्यमंत्री माझ्या कानात म्हणाले, तुम्ही मुंबईला येत नाही. या एकदा मुंबईला. बसू आपण. हे सगळं बाळासाहेब थोरात ऐकत होते. काँग्रेसवाले मला ताप द्यायला लागले तर मी भाजपवाल्यांना बोलावून घेत असतो. मग ते मला ताप कमी देतात, असं मुख्यमंत्री मला म्हणाले. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, सध्या ना काँग्रेस, ना राष्ट्रवादी कुणीही तुम्हाला कोणीही ताप देणार नाही. पण तुम्हाला जर काही अनुभव आला असेल तर आपण बसू, असं दानवे म्हणाले. त्यावर मंथन होत असतं तुम्हाला युतीचा काही प्रस्ताव मिळाला का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा असे प्रस्ताव उघडपणे देत नसतात. पण मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याशी विविध विकास कामांवर चर्चा करणार आहे, अशा चर्चेवेळी राजकीय चर्चा होत असतातच, असंही ते म्हणाले. जाहीरपणाने बोलण्यातून जे काही येत असतं त्यावर मंथन होत असतं, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
तर जनता खूष होईल
25 -30 वर्ष आमची युती आहे. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी ही युती घडवून आणली आहे. अचानकपणे शिवसेनेने आमची साथ सोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले. त्यामुळे आमचं सरकार येऊ शकलं नाही. खरंतर जनतेने कौल युतीला दिला. पण सेनेने वेगळं जाण्याचा निर्णय घेतल्याने या राज्यात एक वेगळ्या प्रकारचं सरकार बनलं आहे. आता हे सरकार बनल्यावर दोन वर्षे झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काही अनुभव आला असेल या अनुभवातून ते असं बोलले असतील. खरंतर आम्ही समविचारी आहोत. आम्ही समविचारी एकत्र आलो तर या राज्यातील जनतेला सुद्धा पसंद पडणार आहे. पण भविष्यात काय घडेल सांगता येत नाही. पण जेव्हा कधी असं घडेल तेव्हा जनता खूष होईल, असंही त्यांनी सांगितलं.
राजकारणात काहीही होऊ शकतं
गेली 25-30 वर्ष आम्ही एकत्रच होतो. राजकारणात कधी काहीही होऊ शकतं. असं काही ठरलेलं नसतं. असं कधी वाटलं नव्हतं की काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल. किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येईल. राजकारणात सर्व शक्यता गृहीत धरायच्या असतात. त्यामुळे मुख्यमंत्री भाषणात बोलले, मीही बोललो. त्याबद्दल काही वाटत नाही आम्हाला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.