Site icon लोकाशा-बंब न्यूज

राज्यात पुन्हा युतीचे संकेत! आजी, माजी आणि भावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

औरंगाबाद, मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने आज औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमांना उपस्थित आहेत. आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा यावरून सुरू झाली आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा रोख दानवे, कराडांच्या दिशेने?

मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. त्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे? याविषयी चर्चा सुरू झाली. “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे त्यावरून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना मागे वळून व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींकडे पाहिलं. यावेळी व्यासपीठावर रावसाहेब दानवे आणि भागवत कराड हे देखील उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या विधानामधून शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याचेच तर संकेत द्यायचे नव्हते ना? याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version