Site icon लोकाशा-बंब न्यूज

तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आक्रमक आणि तीव्र लढा उभारू,खा.प्रितमताई मुंडे यांचा राज्य सरकारला इशारा;परळीत भाजपचे निषेध आंदोलन

परळी । दि. १५ ।
ओबीसींच्या राजकीय आरक्षण विषयी भूमिका मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये ओबीसींवर अन्याय होत आहे.महाविकास आघाडी सरकारने जर वेळेत न्यायालयात इंपेरिकल डेटा सादर करून भूमिका मांडली नाही तर येणाऱ्या काळात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा आणखी आक्रमक आणि तीव्र करू असा इशारा प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी दिला आहे.परळी येथे भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात त्या बोलत होत्या.

निवडणूक आयोगाने राज्यातील धुळे,नंदुरबार, वाशीम,अकोला,नागपूर येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.राज्य सरकारने न्यायालयात वेळेत इंपेरिकल डेटा सादर केला असता तर होणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण कायम राहिले असते,परंतु महाविकास आघाडी सरकारच्या विरोधी धोरणामुळे ओबीसी समाज राजकीय आरक्षणाला मुकला आहे.

समाजातील शैक्षणिक,आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी घटनेत आरक्षणाची तरतूद केली आहे.परंतु राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ओबीसी प्रवर्गातील अनेकांना राजकीय आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.तळागाळातील सर्व समाजाच्या वंचित आणि दुर्लक्षितांना जर प्रतिनिधित्व द्यायचे असेल तर राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होणे आवश्यक आहे,आणि त्यासाठी आम्ही लढा देत राहू अशी भूमिका यावेळी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी मांडली.

मागणी करणारांना आरक्षण दिले जात नाही;ज्यांना आहे त्यांचे काढून घेतले जात आहे

महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करताना खा.प्रितमताई मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.मागणी करणारांना आरक्षण द्यायचे नाही आणि ज्यांना आहे त्यांचे काढून घ्यायचे’ असे दुहेरी पाप हे सरकार करत आहे,आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आणि ओबीसी समाजातील सर्वसामान्यांवर अन्याय होतो आहे.भारतीय जनता पक्ष राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी उग्र लढा देईल असेही त्या यावेळी म्हणाल्या.

•••••

Exit mobile version