धारूर दि .14 सप्टेंबर – भाजपा नेते रमेश आडसकर ( Ramesh Adaskar ) यांचे वर्चस्व असलेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीतील 22 भुखंड वाटपाबाबत सात संचालकांनी तक्रार केली होती . या तक्रारीवरुन पणन संचालक सतिश सोनी यांनी निकाल देत भुखंड वाटप रद्द केल्याचे आदेश दिले आहेत . गेल्याच आठवड्यात बाजार समिती आवारातील 50 लक्ष रुपयांच्या निविदा प्रक्रियेस सहायक निबंधकांनी स्थगिती दिली होती . यामुळे बाजार समितीला हा दुसरा धक्का बसला आहे .
येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत भाजपाचे ( BJP ) निर्विवाद वर्चस्व आहे . तर राष्ट्रवादीचे ( NCP ) सात सदस्य आहेत . विधानसभेच्या निवडणूकीतील प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आ.प्रकाशदादा सोळंके व भाजप नेते रमेश आडसकर यांच्यामुळे बाजार समिती चर्चेत आहे . बाजार समितीने दि .14 / 01 / 2020 मधील ठराव क्र 5 व दि .16 / 06 / 2020 मधील ठराव क्र 10 प्रमाणे आवारातील 22 रिक्त भुखंडाचे वाटप केले होते . परंतू यास चंद्रकांत हरिकिशन लगड , गणेश बिभिषण सोळंके , सादेक बाबामिया इनामदार यांच्यासह सात संचालकांनी तक्रार दाखल केली होती . या तक्रारीवरुन जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था बीड यांनी चौकशी केली . चौकशीचा अंतिम अहवाल पणन संचालनालयाकडे सादर करण्यात आला . या अहवालावरुन दि .2 सप्टेंबर रोजी पणन संचालक सतिश सोनी यांनी सदरील 22 भुखंड वाटप रद्द करण्याचे आदेश काढत कार्यवाहीचे निर्देश दिले .
सहायक निबंधकांचा दणका
धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीने ( market committee ) रस्त्याचे काम करण्यासाठी पन्नास लक्ष रुपयांची टेंडर काढण्यात आले होते . बाजार समिती संचालक चिंतामण सोळंके व अमोल जगताप यांनी तक्रार केल्यानंतर या तक्रारीची दखल घेत सहाय्यक निबंधक धारूर यांनी 50 लाख रुपयांची टेंडर प्रक्रियेस ( tender notice ) स्थगित करण्याचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले आहेत . राष्ट्रवादी काँग्रेसकडून फटाक्याची आतषबाजी 22 भुखंड रद्दचे आदेश प्राप्त झाल्याने आज दि .14 मंगळवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला . आ.प्रकाशदादा सोळंके ( Prakash Solanke ) यांनी नावारुपाला आणलेली कृषी उत्पन्न बाजार समिती सत्ताधारी सभापती व संचालक समितीत भ्रष्टाचार करुन विकण्याचे कार्य करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा संचालक आमोल जगताप यांनी यावेळी केला . यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितिन शिनगारे , युवानेते सुधीर शिनगारे , बालासाहेब मायकर , नगरसेवक संजित कोमटवार , सटवा अंडील , प्रदीप नेहरकर , गौतम चव्हाण , परमेश्वर राऊत , सय्यद रज्जाक यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .