अंबाजोगाई/प्रतिनिधी:
गणेश मंडळास कमी पैशात साऊंड सिस्टिम का लावली असे कारण काढून तालुक्यातील वानटाकळी येथे एकास बेदम मारहाण झाल्याची घटना दि. १२ रोजी घडली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
वानटाकळी येथील मुंजा सुखदेव गायके ( वय २३) यांनी आपली साऊंड सिस्टिम गावातील जयमल्हार गणेश मंडळास लावली आहे. आरोपींनी त्यांना तू कमी पैशात साऊंड सिस्टिम का लावलीस आमची साऊंड सिस्टिम लावायची होती. या कारणावरून डोक्यात गजाने मारून जखमी केले व पाठीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत मुकामार दिला व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंजा सुखदेव गायके यांच्या फिर्यादीवरून नितीश सुखदेव गायके, बाळू रघुनाथ गायके, हनुमंत मल्हारी कारेकंटे, मल्हारी मच्छिंद्र कारेकंटे (सर्व रा. वानटाकळी) यांच्याविरुद्ध अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुरनं २७७/ २०२१ कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस जमादार मोरे करीत आहेत.