मुंबई (प्रतिनिधी):- अंजनवती, घारगाव, वडवाडी व बोरखेड या गावांना ओव्हरलोडमुळे विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने मौजे अंजनवती येथे नवीन 33 के.व्ही. उपकेंद्र मंजुर करण्यात यावे अशी मागणी या भागातील शेतकर्यांची होती. तसेच पाली येथे नवीन 33 के.व्ही. उपकेंद्र उभारण्यात यावे याबाबतही पालीच्या परिसरातील नागरिकांची मागणी होती. आता अंजनवती आणि पाली या दोन नवीन 33 के.व्ही. उपकेंद्राचा प्रश्न लवकरच आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून मार्गी लागणार आहे. या दोन नवीन 33 के.व्ही. उपकेंद्राच्या मंजुरीसाठी उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. दोनही 33 के.व्ही. उपकेेंद्रास तात्काळ निधी दिला जाईल असे सांगत जागा हस्तांतर याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे निर्देश या बैठकीत राज्यमंत्री प्रजक्त तनपुरे यांनी दिले आहेत.गुरूवार दि.9 सप्टेंबर 2021 रोजी मंत्रालयात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या पुढाकारातून उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली अंजनवती, घारगाव, बोरखेड आणि पाली येथील अशा दोन नवीन 33 के.व्ही. उपकेंद्राच्या मंजुरीसाठी बैठक मंत्रालयात बोलवण्यात आली होती. या बैठकीला उर्जा विभागाचे प्रधान सचिव वाघमारे, महावितरणचे प्रकल्प संचालक भालचंद्र खंडाईत, महापारेषणचे कार्यकारी संचालक श्रीकांत राजुरकर, वितरणचे कार्यकारी संचालक भादीकर, महावितरणचे अधिक्षक अभियंता सुनिल काकडे, अधिक्षक अभियंता पोलप व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी आ.संजय दौंड यांची विशेष उपस्थिती होती. महावितरणकडून अंजनवती येथे नवीन 33 के.व्ही. उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले असून या उपकेंद्राची किंमत 3 कोटी रूपयांच्या जवळ असून एसीएफमधून त्यास मंजुरी देण्याचे निर्देश या बैठकीत उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहेत. तसेच पाली येथील नवीन 33 के.व्ही. उपकेंद्र प्रस्तावास शासनाच्या व्हिआयपी प्लॅनमधून निधी दिला जाईल. लवकरच या दोन्ही 33 के.व्ही. उपकेेंद्राचे काम सुरू झाले पाहिजे यासाठी जागा हस्तांतर व पुढील कार्यवाही तात्काळ करून तसा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा असे निर्देशही उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित अधिकारी यांना दिले आहे. चौकटशहरातील कुजलेले व वाकलेले पोल व लोंबकाळलेल्या तारा बदलण्याच्या सूचनाबीड शहरातील अनेक भागात महावितरणचे पोल कुजलेले तर काही ठिकाणी वाकलेले आहेत. तसेच अनेक ठिकाणी वीजेच्या तारा लोंबकळलेल्या आहेत. शहरातील नागरिकांच्या जीवाला यामुळे धोका होवू शकतो तरी कुजलेले वाकलेले पोल बदलून लोंबकळलेल्या तारा तात्काळ दुरूस्त करण्यात याव्यात अशा सूचना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केल्यानंतर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शहरातील नागरिकांना कुजलेले व वाकलेले पोलपासून व लोंबकळलेल्या तारापासून कोणाच्या जिवितास धोका होवू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश यावेळी त्यांनी अधिक्षक अभियंता महावितरण यांना दिले आहेत.