बीड : तालुक्यातील चौसाळा येथे मद्यधुंद झालेल्या लेकाने शुक्रवारी (दि.२०) रात्रीच्या वेळी स्वतःच्या जन्मदात्या वृद्ध आईला बेदम मारहाण केली. सकाळ उजाडताच आईचा जीव गेल्याचे लक्षात आल्याने त्याने सासरवाडीकडे पळ काढला. मात्र, नेकनूर पोलिसांनी पाठलाग करून त्यास बेड्या ठोकल्या.
प्रयागबाई पांडुरंग मानगिरे (वय ७०, रा.चौसाळा, ता. बीड) असे त्या मयत वृद्धेचे नाव आहे. शुक्रवारी रात्री प्रयागबाईचा मुलगा मदन पांडुरंग मानगिरे (वय २८) मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि त्याने आईला बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रयागबाईंचा मृत्यू झाला. ही बाब शनिवारी सकाळी मदनच्या लक्षात आली. भेदरलेल्या मदनने तत्काळ तिथून पळ काढला आणि बीड-गेवराई मार्गे तो महाकाळा येथे सासरवाडीत पोहोंचला. तिथून तो अन्य ठिकाणी फरार होणार होता, याची माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे सपोनि. लक्ष्मण केंद्रे व यांना मिळताच त्यांनी दिड तास पाठलाग करून शहागड येथून संशयित आरोपी मदन यास ताब्यात घेतले. तसेच एक दुचाकीही ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस पुढील तपास करत आहेत.