बीड दि .21 : दिवसाढवळ्या धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना आडवून त्यांच्याकडे बळजबरीने , धमकावून पैशाची मागणी केली जात होती . याची माहिती महामार्ग पोलीसांना मिळताच त्यांनी रांजणी परिसरातून दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले . तर एकजण फरार झाला . या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे . विक्की दत्तात्रय आठरे ( वय 28 रा.आसरानगर पाथर्डी , जि.नगर ) , नितीन सुभाष जगताप ( वय 27 रा.नविन कावसान ता.पैठण जि.औरंगाबाद ) यांना ताब्यात घेतले असून गणेश भाबड ( वय 25 रा.आगसखांड.ता.पाथर्डी जि.नगर ) हा फरार झाला आहे . वरील तरुण शुक्रवारी राष्ट्रीय महामार्गावरील रांजणी मध्ये वाहने अडवून त्यांना धमकावून पैशाची मागणी करत असल्याची माहिती नितीन विजय वाणी या टेम्पो चालकाने पाडळसिंगी टोलनाक्यावर असणाऱ्या महामार्ग पोलीसांनी दिली . त्यांनी तातडीने रांजणीकडे धाव घेतली . यावेळी वरील आरोपींनी काही गाड्यांना अडवल्याचे दिसून आले . यातील विक्की व नितीन यांना ताब्यात घेताच गणेशने पलायन केले . तसेच त्यांची दुचाकी ( एमएच -15 इएल -8056 ) जप्त केली . या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे . ही कारवाई महामार्ग पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .