Site icon लोकाशा-बंब न्यूज

एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयातच अधिकार्‍याकडून महिला कर्मचार्‍याला मारहाण,महिलेची विभागीय नियंत्रकांकडे तक्रार, उद्या होणार चौकशी


बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील एका महिला कर्मचार्‍याला अधिकार्‍याने छेडछाड करीत कार्यालयातच मारहाण केल्याची घटना 14 ऑगस्ट रोजी घडली होती. घाबरलेल्या महिलेने बुधवारी याबाबत विभागीय नियंत्रकांकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकाराने एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे. तर दुसर्‍या बाजूला महिलेच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा अधिकार्‍याने केला आहे.
विभागीय कार्यालयात महिला कर्मचार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वीही साधारण दोन वर्षांपूर्वी एका अधिकार्‍याने आपल्याच विभागातील महिला कर्मचार्‍याची छेडछाड करत शरीर सुखाची मागणी केली होती. याची तक्रार केल्यानंतर दक्षता समितीने चौकशी केली. यात दोषी आढळल्याने संबंधित अधिकार्‍यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला होता. ही घटना विसरण्यापूर्वीच आता लेखा विभागात नवीन घटना घडली आहे. अविवाहित महिला कर्मचारी काम करत असताना तिला प्रभारी लेखापाल नारायण मुंडे यांनी वाईट हेतूने स्पर्श केला. यावर ती रागावून वरिष्ठांकडे तक्रार देण्यास जाताना तिला पायर्‍यांवर अडवून मुंडे यांनी मारहाण केली. तसेच नौकरी घालविण्याची धमकी दिल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. या प्रकाराने मात्र, बीड रापम कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

कोट
5 ऑगस्ट रोजीही धमकावल्याचा प्रकार घडला होता. पीडित महिला कर्मचारी विभागीय नियंत्रक अजय मोरे यांच्याकडे तक्रार घेऊन गेली. यावर तिला डेपोत बदली करतो, नाहीतर आणखी त्रास सहन कर, असे उत्तर दिल्याचे पीडिता सांगते. या प्रकारावरून मोरे यांच्याकडूनही अधिकार्‍याला अभय असल्याचा आरोप केला जात आहे.

चौकट
माझ्या विभागात 10 ते 12 महिला कर्मचारी आहेत. सर्वांना आई-बहिणीप्रमाणे सन्मान देतो. माझ्यावर केलेले आरोप सर्व खोटे असून त्यात काहीही तथ्य नाही. केवळ बदली पाहिजे म्हणून हे करण्यात आले आहे. याने माझीच मानसिकता खचली असल्याचे रापमचे लेखापाल नारायण मुंडे यांनी म्हटले आहे.

प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल – मोरे
माझ्याकडे तक्रार आली आहे. बुधवारी रात्री उशिरा तक्रार आली असून गुरूवारी सुट्टी आहे. शुक्रवारी दोघांनाही समोर बोलवून चौकशी केली जाईल, असे विभागीय नियंत्रक अजय मोरे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version