Site icon लोकाशा-बंब न्यूज

आता गावातच मार्गी लागणार ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ! ‘थोडेसे मायबापांसाठी पण’ च्या उपक्रमातून ज्येष्ठांचे आयुष्य सुखकर होणार, ज्येष्ठांचा सर्वे करण्यासाठी मराठवाड्यात बीड जिल्हा परिषद झपाट्याने कामाला लागली

   
बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : उर्वरित आयुष्य सुखकर व्हावे याकरिता आता गावातच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येणार आहेत. त्यांच्या समस्या लक्षात घेवूनच त्यांना तशा गावातच भविष्यात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठीच आयुक्तलयाने ‘थोडेसे मायबापांसाठी पण’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून ज्येष्ठांचे उर्वरित आयुष्य सुखकर होणार आहे. त्याअनुषंगानेच सध्या ज्येष्ठांचा सर्वे करण्यासाठी मराठवाड्यात बीड जिल्हा परिषद झपाट्याने कामाला लागली आहे.
कुटूंब श्रीमंत असो की गरीब…ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. आरोग्यबरोबरच त्यांच्यासमोर अन्य समस्या उद्भवतात. अशा वेगवेगळ्या कारणामुळेच जीवन जगावे की नाही असा प्रश्‍नही अनेकांना पडतो, अनेकांना नैराश्यही येते, यातूनच वेगवेगळ्या घटनाही घडतात. या सर्व समस्येंवर मात करण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना आपले उर्वरित आयुष्य आनंदात घालवण्यासाठी आता विभागीय कार्यालयाने एक महत्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘थोडेसे मायबापांसाठी पण’ असे त्या उपक्रमाचे नाव आहे. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून त्यांना त्याप्रमाणे गावातच सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याअनुषंगानेच सध्या बीडची जिल्हा परिषद झपाट्याने कामाला लागली आहे. आयुक्तालयाने हाती घेतलेला हा उपक्रम खरोखरच ज्येष्ठांचे आयुष्य बदलणारा आणि त्यांना सुखकर जिवन देणारा ठरणार आहे.

आशाताई अन् अंगणवाडीताईंच्या
माध्यमातून जिल्ह्यात सुरू आहे सर्वे
या उपक्रमासाठीच सध्या बीड जिल्हा परिषदेने सर्वे सुरू केला आहे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आशाताई, अंगणवाडीताई आणि डाटा ऑपरेटवर सोपविण्यात आली आहे. या कामासाठी एका ज्येष्ठ नागरिकाचा अर्ज भरून घेण्यासाठी आशाताई आणि अंगणवाडीताईंना दहा रूपये तर डाटा ऑपरेटरला पाच रूपये संबंधित ग्रामपंचायत देणार आहे. या सर्वेनंतर कोणत्या गावात कोणत्या सुविधा पुरवायच्या हे निश्‍चित केले जाणार आहे.

ज्येष्ठांचे उर्वरित आयुष्या सुखकर होणार
– एसीईओ आनंद भंडारी
ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच कोणत्यान कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागते, परिणामी त्यांना आपले उर्वरित आयुष्य सुखकर जगता यावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. जिल्ह्यात या उपक्रमाला नक्कीच यश येईल, असा विश्‍वास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी व्यक्त केला आहे.

समस्यांवर मात करता येणार – गिरी
कुटंब श्रीमंत असो की गरीब…त्या त्या कुटूंबात ज्येष्ठ नागरिकांचे हाल पहायला मिळतात. आपले उर्वरित आयुष्य ज्येष्ठांना आनंदी जगता यावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळेच ज्येष्ठांना वेगवेगळ्या समस्येवर खर्‍या अर्थाने मात करता येणार आहे. कारण तशा सेवा सुविधा या उपक्रमातून ज्येष्ठांना देण्यात येणार असल्याचे झेडपीच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी म्हटले आहे. 

Exit mobile version