बीड, 11 ऑगस्ट : शेळ्या चरत असलेल्या एकट्या महिलेला वाईट हेतूने छेडछाड (molestation) करणाऱ्या तरुणाला विरोध केला म्हणून महिलेला कुऱ्हाडीने अमानुष मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बीड (beed) तालुक्यातील महाजनावाडी येथे उघडकीस आली. महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याने गंभीर जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील वंदना चंद्रकांत बोराडे वय (36) ही महिला गावातील कॅनॉल परिसरात शेळ्या चारत असताना गावातील संकेत पपु गायकवाड हा त्या ठिकाणी आला. एकटी आहे, आजू बाजूला कुणीही नाही बघून अंगावर हात टाकून पदर ओढला. तसंच वाईट हेतूने अंगावर चढून आला. त्यामुळे वंदनाने त्याला पूर्ण ताकदीने विरोध केला.
यामुळे संतापलेल्या नराधम संकेत गायकवाडने हातातील कुऱ्हाडीने तिच्यावर हल्ला चढवला. डोक्यावर, हातावर आणि पायावर कुऱ्हाडीने मारहाण केली. रागाच्या भरात आपल्या हातातून घडलेल्या कृत्यानंतर वंदनाला रक्ताच्या थारोळ्यात सोडून तिथून त्याने पळ काढला.मारहाण एवढी भयानक होती की, डोक्यात 40 टाके पडले असून हात आणि पाय फॅक्चर झाला आहे.
जखमी अवस्थेत वंदनाने आरडा ओरडा केल्यानंतर गावातील बाकीचे लोक धावून आले. त्यांनी तातडीने वंदनाला बीड येथील दवाखान्यात दाखल केले. या प्रकरणात पीडित त्याच्या आईने पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही, असा आरोप केला आहे.
तसंच एवढी मारहाण झाल्यानंतर देखील आरोपी मोकाट फिरत असून त्याला अटक करा अशी मागणी पीडित नातेवाईकांनी केली आहे.
बीड शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये पीडितेवर उपचार सुरू असून गुन्हा दाखल करून न्याय द्या, अशी मागणी तिच्या आईने थेट पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात गावातील आरोपी हा प्रतिष्ठित व्यक्तीचा मुलगा असल्याने पोलीस त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे.