Site icon लोकाशा-बंब न्यूज

पीडीतेवर अत्याचार करणार्‍या नराधमाला फाशी द्या, न्यायासाठी चुंबळीतील पीडित मुलीच्या कुटूंबियांच्या पाठीशी उभ्या राहिल्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचीही केली मागणी


बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : मागच्या चार दिवसांपुर्वी पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे माणूसकीला काळीमा फासेल अशी घटना घडली, या घटनेतील पीडितेला न्याय मिळावा याकरिता मंगळवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पाटोदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आंधळे यांची भेट घेवून आपल्या मागणीचे निवेदन त्यांना दिले. पीडितेवर अत्याचार करणार्‍या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, अशी मागणी या निवेदनाव्दारे अ‍ॅड प्रज्ञा खोसरे यांनी केली आहे. तसेच खोसरे यांनी सदर मुलीच्या कुटूंबियांची भेट घेवून त्यांना धीर देण्याचेही काम केले.
पालकमंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली सदर महिला पदाधिकार्‍यांनी त्या पीडित कुटूंबियांची मंगळवारी भेट घेतली. पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथील एका 14 वर्षीय मुलीवर तिच्या शेजारीच राहणार्‍या तीस वर्षे नराधमाने अत्याचार करून तिला फासावर लटकवले, या प्रकरणी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे पीडित मुलीच्या घरी तिच्या आई- वडिलांची भेट घेण्यात आली, त्यांना या प्रकरणी धीर देण्यात आला व हे प्रकरण फास्ट ट्रॅक वर टाकण्यात येऊन त्या नराधमाला फाशीची शिक्षाही देण्यात यावी, अशी मागणी पाटोदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आंधळे यांना देण्यात आलेल्या निवेदनाव्दारे अ‍ॅड प्रज्ञा खोसरे (मराठवाडा समन्वयक), सौ संगीताताई तूपसागर (जिल्हाध्यक्ष बीड), नीलाताई पोकळे (तालुकाध्यक्ष पाटोदा), भोसले ताई( तालुका उपाध्यक्ष) यांच्यासह अन्य महिला पदाधिकार्‍यांनी केली आहे.

Exit mobile version