Site icon लोकाशा-बंब न्यूज

दिल्लीत नेत्यांची खलबतं, भाजपा प्रदेशाध्यक्ष बदलणार का?

नवी दिल्ली – राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते शनिवारपासून दिल्लीत असल्याने महाराष्ट्रात अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात काही व्यूहरचना दिल्लीत आखली जातेय का? भाजपामध्ये संघटनात्मक बदल करून चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांनी आज दिल्लीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट घेतली.या भेटीनंतर माध्यमांनी चंद्रकांत पाटलांना विचारलेल्या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा फेटाळून लावली. ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष बदलणार ही चर्चा केवळ मीडियात आहे. पक्षात अशी कुठलीही चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचार नाही. भाजपा काय आहे तुम्हाला कळालं नाही. सामान्य माणसाला भाजपा समजली आहे. याठिकाणी दर ३ वर्षांनी अगदी खालच्या स्तरातून राष्ट्रीय स्तरापर्यंत पदाधिकारी बदलला जातो. काँग्रेसला अद्याप पक्षाचा अध्यक्ष मिळाला नाही. भाजपाचं तसं नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.तसेच दिल्लीत येण्यामागे कुठलाही राजकीय हेतू नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राज्याला केंद्रीय मंत्री मिळाले. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी दिल्लीत आलो आहे. प्रत्येक मंत्र्यांची खाती समजून घेत त्यांचा राज्याला कसा फायदा होईल यावर या भेटीत चर्चा झाल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सहा दिवसांसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे सुद्धा दिल्लीत जाणार आहेत. या दिग्गज नेत्यांच्या अचानक ‘दिल्लीवारी’मुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. याचवेळी याचवेळी वरिष्ठ नेत्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. मग भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार का? असा प्रश्न खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला फडणवीस यांनी उत्तर देताना मोठं विधान केलं होतं.फडणवीस म्हणाले,आमचे दिल्ली दौरे असले तरी कुठलेही संघटनात्मक बदल महाराष्ट्रात होणार नाहीत. नवीन मंत्र्यांच्या भेटीगाठी आणि महाराष्ट्रातले प्रश्न आम्ही दिल्लीत मांडतोय. पण सध्या तरी भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कुठेही चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी पक्ष उभा आहे. कृपया पतंगबाजी करु नका, बातम्या कमी पडल्या तर मला एखादी बातमी मागा मी देईन असे म्हणतातच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

Exit mobile version