Site icon लोकाशा-बंब न्यूज

पारावर बसून आ. संदिप क्षीरसागरांनी ऑन द स्पॉट सोडवले प्रश्‍न, खडकीघाटचा पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लागला



बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : गेल्या दशकभरापासून दफ्तर दिरंगाईत रखडलेल्या खडकीघाट येथील पुनर्वसनाचा प्रश्‍न बुधवारी अखेर आ. संदीप क्षीरसागर यांनी गावच्या पारावर बसून प्रशासकीय बैठक घेत निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. तीन महिन्यात रखडलेले सर्व प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन या वेळी उपस्थित गावकर्‍यांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिले. 2009 सालापासून सदरच्या पुनर्वसनाचा आणि तेथील नागरिकांना नागरी सुविधेचा प्रश्‍न भेडसावत होता.
बीड तालुक्यातील खडकीघाट येथील पुनर्वसनाचा प्रश्‍न 2009 पासून रखडलेला आहे. कबाले वाटप करणे यासह नागरि सुविधा अद्याप उपलब्ध नव्हत्या. या बाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी शासन-प्रशासन दरबारी मागणीही केली होती. मात्र गावकर्‍यांच्या या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत होते. अखेर बुधवारी आ. संदीप क्षीरसागर यांनी खडकीघाट येथे जाऊन पारावर बसत येथील नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी गावकर्‍यांसह अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या वेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी आघाव, कार्यकारी अभियंता वानखेडे, तहसीलदार वमने, गटविकास अधिकारी मोराळे, जिचल्हा पुनर्वसन मंडळ अधिकारी सुत्रे, मंडळ अधिकारी सोळंके, वंजारे, सुरेश पाळदे, तलाठी राऊत हे उपस्थित होते. आतापर्यंत 190 पैकी 54 लोकांना कबाले दिले गेले आहेत. उर्वरित लोकांना तात्काळ कबाले देण्याचा निर्णय या वेळी झाला. कबाले वाटप तसेच त्याच्या पावत्या हे संबंधितांना देण्यात येणार असून नागरी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी आ. क्षीरसागरांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. तीन महिन्यामध्ये या गावचे सर्व प्रश्‍न सोडवण्याचे सांगत गेल्या दहा वर्षांपासून खडकीघाट येथील पुनर्वसनाचा प्रश्‍न अखेर बुधवारी आ. संदीप क्षीरसागरांनी मार्गी लावल्याचे समाधान उपस्थित गावकर्‍यांनी व्यक्त केला.

Exit mobile version