बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : पीक विम्यासाठी शेतकर्यांसह जिल्ह्यातील संघटनांची दमछाक होताना दिसून आहे. त्यामुळे राज्य सरकारला पिक विम्याव्दारे मिळालेले 550 कोटी पालकमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळवून देणार का? असा सवालही आता जिल्ह्यातील शेतकर्यांमधून व्यक्त केला जात आहे. दरम्यान विम्याची रक्कम न मिळाल्यास जिल्ह्यातील अनेक शेतकरी कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत.
गतवर्षी जिल्ह्यातील 17 लाखा 90 हजार अर्जाव्दारे शेतकर्यांनी विम्याचे 60 कोटींहून अधिक रक्कमेचा भरणा केलेला आहे, त्यापैकी केवळ 20 हजार शेतकर्यांचा विमा मिळालेली आहे. उलट या विमा प्रक्रियेतून विमा कंपनीला 159 कोटी तर राज्य सरकारला तब्बल 550 कोटी रूपये मिळाले आहेत. सदर प्रश्नावर कृषी मंत्र्यांनी न्याय देण्याचे शेतकर्यांना आश्वासन दिले आहे, असे असले तरी पिक विम्याची रक्कम जिल्ह्यातील शेतकर्यांना अद्याप मिळालेली नाही, या वर्षातील पिक विम्यातून मिळालेली रक्कम शेतकरी कल्याणासाठी खर्च केला जाईल, असे सांगितले जात आहे. तर दुसर्या बाजूने हा विमा प्राप्त करून घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी आणि संघटना सातत्याने त्यावर आवाज उठवित आहेत, असे असले तरी त्यांच्या आवाजाची अद्याप राज्य सरकारने दखल घेतलेली नाही, त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत गेलेले 550 कोटी पालकमंत्री धनंजय मुंडे आपल्या जिल्ह्याला मिळवून देणार क? असा सवाल आता जिल्ह्यातील शेतकर्यांमधून विचारला जात आहे. मागील दोन वर्षात बीड जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहे, यातून नेतृत्वच कुठे कमी पडतेय का? असाही प्रश्न आता निर्माण होवू लागला आहे.