Site icon लोकाशा-बंब न्यूज

पूरग्रस्तांसाठी परळीतून मदतीचे दोन ट्रक कोल्हापूरला रवाना ; पंकजाताई मुंडे यांनी दाखवला झेंडा,पाच हजार कुटुंबांना तांदूळ, गव्हाचे पीठ, दाळीसह अन्नधान्याचे किट

परळी । दिनांक ३१ ।
राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परळी येथून भाजपतर्फे गव्हाचे पीठ, तांदूळ, तूर दाळीसह २२० क्विंटल अन्नधान्याचे पॅकेटस आज पाठवण्यात आले. ही मदत घेऊन जाणाऱ्या दोन ट्रकला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज झेंडा दाखवला आणि मदत रवाना केली.

महाराष्ट्रावर आलेले संकट लक्षात घेऊन पंकजाताई मुंडे यांनी स्वतःच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्या अनुषंगाने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजप कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत देऊ केली. भाजपतर्फे पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून गुरूवारी मदतफेरी देखील काढण्यात आली होती. सर्व सामान्य नागरीक आणि व्यापाऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या फेरीत २ लाख ७० हजार ३४० रूपयांचा निधी जमा झाला. कार्यकर्त्यांच्या योगदानातून जमा झालेली ३ लाख ५० हजार व तितकीच मदत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने देऊन पूरग्रस्तांसाठी आवश्यक वस्तू,अन्नधान्य,कपडे.इ साहित्य आज रवाना केले. पाच हजार कुटुंबांसाठीच्या या रेशन किटमध्ये पाच किलो गव्हाचे पीठ,तूर डाळ, तांदूळ आणि इतर आवश्यक साहित्य आहे.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि भाजपचे कार्यकर्ते ही मदत घेऊन कोल्हापूरला रवाना झाले. अतिवृष्टीमुळे संकटाचा सामना करणाऱ्या पूरग्रस्तांना ही मदत मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
••••

Exit mobile version