Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडसह राज्यातील अकरा जिल्ह्यात निर्बंध कायम , आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


मुंबई दि .29 – राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे . तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निबंध कायम राहणार आहेत , अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली . राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही घोषणा केली . टास्क फोर्सची मिटींग पार पडली . त्यात 25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे . तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल . त्यावर ते सही करतील . त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे , असं टोपे यांनी सांगितलं . राज्यातील अकरा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे . ही परिस्थिती अजून निवळलेली नाही . त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे , सोलापूर , सांगली , सातारा , कोल्हापूर , कोकणात रायगड , सिंधुदुर्ग , रत्नागिरी , पालघर , मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील . हे अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत , असं त्यांनी सांगितलं . दरम्यान सिनेमा गृह आणि मॉल मधील कर्मचारी यांच लसीकरण पूर्णपणे करुन चालू ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे . रेल्वे विभागाशी चर्चा करुन लोकल सुरु करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं टोपे यांनी सांगितलं . लोकल प्रवासाबाबत पुढील एक ते दोन दिवसांत निर्णय येण्याची शक्यता आहे , असंही ते म्हणाले .

Exit mobile version