कडा, दि. 26 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील अंभोरा ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला 80 हजारांची लाच घेताना औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. सोमवार (दि.26) रोजी कारवाई करण्यात आली. अटकपुर्व जामीन रोखण्यासाठी एक लाखाची मागणी करण्यात आली होती.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्यातील राहुल पांडुरंग लोखंडे असे लाचखोर पोलिसाचे नाव आहे. सध्या ते अंभोरा ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. एका तक्रादाराकडून गुन्ह्यात मंजूर असलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रद्द न करण्यासाठी तसेच गुन्ह्यातील वाहने जप्त न करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडी अंती एैशी हजारांची लाच घेताना औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहुल लोखंडेला लाच घेताना पकडले आहे. दरम्यान याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. या खाकीतील लाचखोरीमुळे पोलिस प्रशासनात भलतीच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत विभागाचे पोलिस निरिक्षक गणेश ध्रोकट, सुनिल पाटील, रविंद्र काळे, विलास चव्हाण, अशोक नागरगोजे, चांगदेव बागुल, आदी कर्मचा-यांनी कारवाईमध्ये सहभागी झाल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे.
अंभोर्याचा पीएसआय 80 हजाराची लाच घेताना पकडला, अटकपुर्व जामीन रोखण्यासाठी केली होती लाखाची मागणी
