Site icon लोकाशा-बंब न्यूज

ओबीसींना न्याय मिळेपर्यंत संघर्षाची मशाल तेवत ठेवू ; राज्य सरकारने तातडीने इम्पेरीकल डाटा तयार करावा,आरक्षण हेच आपले कवचकुंडल,लढ्यात सर्वांसोबत सर्वात पुढे राहू, ओबीसी मेळाव्यात पंकजाताई मुंडे यांचे प्रतिपादन

लातूर । दिनांक २४ ।
स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने ओबीसी समाजासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर कायमस्वरूपी उत्तर शोधण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने योगदान द्यायचे आहे.जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत संघर्षाची मशाल तेवत ठेवणार असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी म्हंटले आहे.लातूर येथे आयोजित ओबीसी मेळाव्याला व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित करताना त्या बोलत होत्या.

ओबीसींच्या राजकीय आरक्षण प्रश्नी आपल्याला कुणालाही दोष द्यायचा नाही,पक्षपात आणि राजकारण करायचे नाही.हा लढा राजकीय हेतूसाठी नसून वंचितांना त्यांचा न्यायहक्क मिळवून देण्यासाठी आहे.आरक्षणाच्या लढ्यात सर्वांनी एकजुटीने समर्पित भावनेने योगदान देऊन आरक्षणाचे संरक्षण करायचे असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

पाच जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुका रद्द झाल्याने राज्य सरकारला पुरेसा वेळ मिळाला असल्याचे सांगताना यावेळेत तातडीने इम्पेरिकल डाटा तयार करावा व वेळ सत्कारणी लावावा असेही त्या म्हणाल्या.तसेच आरक्षण हेच ओबीसींचे कवचकुंडल असून या लढ्यात पंकजा मुंडे सर्वांसोबत सर्वात पुढे असेल असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.आरक्षणाच्या लढाईत राजकीय जोडे,पक्ष,विचारधारा बाजूला ठेवून सर्वजण एकत्र आले याचे कौतुक करताना त्यांनी आपली वज्रमुठ मजबूत करून एकजुटीने लढा देऊ आणि पुढची पिढी मागे वळून बघताना आपल्या कार्याची दखल घेईल असे योगदान देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

••••

Exit mobile version