धारुर- तालुक्यातील तेलगाव साखर कारखाना परिसरातील विहिरीत एका 24 वर्षे विवाहितेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. दरम्यान, ही आत्महत्या नसून सासरच्या लोकांनी हत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
शिवकन्या ज्ञानेश्वर आडे असे मृत विवाहितेचे नाव आहे. सैनिक असलेले ज्ञानेश्वर आडे हे गुरुवारी दुपारी पत्नी शिवकन्यासोबत शेतामध्ये गेले होते. अचानक शिवकन्या शेतातून गायब झाली. ज्ञानेश्वर यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र पत्नी आढळून आली नाही. यानंतर शेताजवळ असलेल्या विहिरीत उडी घेतल्याच्या संशयावरून तिकडे शोध सुरु केला. विहिरीत मोठ्या प्रमाणावर गढूळ पाणी होते. रात्रभर तीन मोटर लावून विहिरीतील पाणी उपसा करण्यात आले. शुक्रवारी सकाळी शिवकन्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. याची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर शिवकन्याच्या हत्येचा आरोप केला आहे. शवविच्छेदन अहवालावरुन ही आत्महत्या की हत्या हे सत्य बाहेर येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी ज्ञानेश्वर आडे यासताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
पतीसोबत शेतात गेलेल्या विवाहितेचा मृतदेह आढळला विहीरीत; नातेवाईकांकडून घातपाताचा आरोप
