बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : दि.21 जुलै रोजी ( चंद्र दर्शनानुसार एक दिवस मागे पुढे ) मुस्लीम बांधवांचा बकरी ईद हा सण साजरा होणार आहे . त्या अनुषंगाने प्रभारी पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात पोलीस बंदोबस्ताचे काटेकोरपणे नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत पोलीसांद्वारे पथसंचलन करण्यात येत असून, सर्व धर्मीय नागरिकांच्या शांतता व मोहल्ला समित्यांची बैठक घेण्यात येवून याद्वारे सध्याच्या कोरोना ( कोव्हिड -19 ) विषाणू संसर्गांचे अनुषंगाने खबरदारीचा उपाय योजना म्हणून ईद साजरी करताना घ्यावयाची काळजी बाबत मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्तरावर जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. बकरी ईद सण साजरा करतांना प्रभारी पोलीस अधीक्षक यांनी आवाहन केले आहे की , सध्या कोव्हिड -19 विषाणूच्या संसर्गाचा पार्श्वभुमीवर मुस्लीम बांधवानी हा सण- उत्सव साध्या पध्दतीने शासनाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे साजरा करावा, बकरी ईदची नमाज ही ईदगाह किंवा मस्जिद तसेच सार्वजनिक ठिकाणी अदा न करता सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने आपल्या घरीच ईदची नमाज अदा करावी, तसेच याबाबत परिसरातील नागरिक व नातेवाईक यांना सुध्दा साध्या पध्दतीने घरीच ईद साजरी करणे बाबत प्रेरित करावे . या सणाचे निर्मीत्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्रित जमू नये, प्रत्येकाने वैयक्तिक खबरदारी घेतल्यास याचा संसर्ग व फैलाव टाळू शकतो, बीड जिल्ह्यात जिल्हाधिकार्यांनी सी.आर.पी.सी. कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केलेली आहे. जिल्हाधिकारी यांचे कोव्हिड -19 प्रादुर्भाव नियंत्रणासाठीचे दिशानिर्देश दि.17 जुलै 2021 अन्वये बीड जिल्ह्यात आष्टी गेवराई पाटोदा या तालुक्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात आवश्यक सेवे व्यतिरिक्त इतर आस्थापना उघडण्याचा कालावधी प्रत्येक दिवशी (सोमवार ते शुक्रवार) सकाळी 07:00 ते दुपारी 12:30 पर्यंत असेल. शनिवार आणि रविवार या दिवशी आवश्यक सेवाच्या पुरवठा संबधित आस्थापना वगळता इतर सर्व आस्थापना पुर्णपणे बंद असतील. सदरचे आदेश दि.19 जुलै 2021 रोजी सकाळी 07:00 वाजेपासून दि.28 जुलै 2021 सकाळी 07:00 पर्यंत संबधित कार्यक्षेत्रात लागू राहतील. तसेच सध्या रात्रीची संचारबंदी लागू असल्यामुळे संचारबंदीच्या काळात नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, त्यामुळे सध्याच्या पार्श्वभूमीवर कायदा मोडणार्या कोणत्याही व्यकतीची हयगय केली जाणार नाही. त्यांचे विरुध्द कडक कायदेशिर कारवाई करण्याबाबतचा इशारा सुध्दा यावेळी मा.प्र.पोलीस अधीक्षक यांनी दिला आहे . या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलातर्फे शांतता / मोहल्ला समित्याच्या एकुण 53 बैठका घेण्यात आलेल्या असून बैठकीद्वारे बकरी ईद साजरी करणे बाबत नागरिकांना मार्गदर्शन करून जगजागृती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येवून या करीता 04 उपविभागीय पोलीस अधिकारी, 16 पोलीस निरीक्षक, 45 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 60 पो.उप.नि, 1605 पोलीस अंमलदार , 360 होमगार्ड , 04 दंगा काबू पथक याप्रमाणे पोलीसांचा फौजफाटा सतर्क राहणार आहे.
बकरी ईद शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त, दोन हजार पोलिसांचा रस्त्यावर दिसणार फौजफाटा तर प्रभारी एसपी म्हणाले, कोरोनाचे सर्व नियम पाळून बकरी ईद शांततेत पार पाडा
