Site icon लोकाशा-बंब न्यूज

परमबीर सिंह ईडीच्या रडारवर; १०० कोटींच्या आरोपप्रकरणी होणार चौकशी

राज्याच्या पोलिस खात्यातील १०० कोटी रुपयांच्या लाचखोरी आणि खंडणी रॅकेटच्या आरोपाशी निगडित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) लवकरच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ५९ वर्षीय सिंह यांना या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांसमोर हजर होण्यास सांगितले असून, सिंह यांनी आरोग्याच्या कारणास्तव जबाब नोंदवण्यासाठी काही अवधी मागून घेतला होता. सिंह आणि देशमुख यांचा सहभाग असलेल्या या प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून काही दिवसांपूर्वी सिंह यांना हे समन्स बजावण्यात आले होते, असे या अधिकाऱ्याने सांगितले. सिंह हे १९८८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, सध्या ते महाराष्ट्र गृहरक्षक दलाचे महासंचालक या पदावर कार्यरत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटके असलेले संशयास्पद वाहन आढळल्याच्या तपासानंतर सिंह यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटविण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी माजी गृहमंत्री देशमुख यांना ईडीने तीन वेळा समन्स बजावले. मात्र, ते हजर झाले नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तर ईडीने याप्रकरणी दोन वेळा वाझे याची नवी मुंबईतील तळोजा तुरूंगात जाऊन चौकशी केली असून, न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर आज, शनिवारी पुन्हा एकदा त्याची चौकशी करण्याची शक्यता आहे.

Exit mobile version