Site icon लोकाशा-बंब न्यूज

दर्ग्याची 103 एकर जमीनवर नेत्यांकडून अधिकार्‍यांच्या संगनमाताने डाका

आष्टी दि.1(लोकाशा न्यूज)ः- आष्टी तालुक्यातील रुई नलकोल येथे शेख महंमद दर्ग्याची सुमारे 103 एकर जमीन आहे. वंशपरंपरागत देवस्थानची सेवा करत जमिन कसून पोट भरणारे अशिक्षित अडाणी लोक जे अंगठाबहाद्दर आहेत त्यांच्या खरेदीखतावर ऊर्दुमध्ये सह्या करत बड्या राजकीय नेत्याने आपल्या कर्मचार्‍याच्या नावे देवस्थानची जमीन करत त्या जमीनीवर डाका घालण्याचे काम केले असून बनावट खरेदीखत तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याशी संगनमताने फसवणूक केली आहे. या जमीनीचे फेर रद्द करून बोगस कागदपत्रं तयार करणार्‍यांवर तत्काळ गुन्हे नोंद करण्यात यवी अशी मागणी केली आहे.
आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथील शेख महंमद दर्ग्याची ईनामी जमिन सर्वे नंबर 75, 76, 77, 81, 81/1, मध्ये एकूण 103 एकर जमिन आहे. जमीन वंशपरंपरागत 7 कुटूंब प्रमुखाच्या नावे सातबारावर असल्याचे पुरावे उपलब्ध असताना ईनामी देवस्थानची सेवा करत असताना, या जमिनीवर बेकायदेशीर रित्या खोटे बनावट दस्तावेज तयार करून आदिनाथ त्रिंबक बोडख, सुरेश गहिनीनाथ बोडखे, गोपीनाथ पांडुरंग बोडखे, शेख मुस्ताक बादशाह यांनी नावावर करून घेतली आहे. जमीन नावची करणारे एका बड्या राजकीय नेत्याच्या शिक्षणसंस्थेत मुख्याध्यापक, प्राध्यापक पदावर आहेत. या व्यक्तींचा ईनामी जमिनीशी काहीही संबंध नसताना मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याशी संगनमताने त्यांनी आपल्या नावे करून सातबारावर फेरफार करून फसवणूक केली आहे. त्यामुळे संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व हस्तांतरित जमिन देवस्थानच्या नावे पूर्ववत करण्यात यावी. तसेच या प्रकरणात जबाबदार उपजिल्हाधिकारी (भु-सुधार) प्रकाश आघाव पाटील व तहसीलदार राजेभाऊ कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणीही केली आहे.

तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
फसवणूक करणारे आष्टीतील राजकीय नेत्याच्या संस्थेवर पदाधिकारी असल्याने नेत्यांनी यांना बोलावून घेऊन प्रत्येकी 2 एक्कर जमिन व एका कुटुंबप्रमुखास नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तक्रार मागे घ्या, असा प्रस्ताव दिला. मात्र मुळ ईनामी देवस्थान जमिनीची सेवा करणार्‍या कुटुंबप्रमुखांनी अमिषाला बळी न पडता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना लेखी तक्रार केली आहे. मात्र अद्यापही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Exit mobile version