Site icon लोकाशा-बंब न्यूज

महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत किती गुप्त भेटी? कोण, कुणाला आणि कधी भेटलं?


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गुप्त भेटीगाठी सुरु आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत चाललंय काय असा प्रश्न आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आणि भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांची आज भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात दोन्ही नेत्यांची भेट झाली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना-भाजप नेत्यांच्या भेटीगाठीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या काही दिवसापासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रातील तीन पक्षाचं सरकार कधीही कोसळेल असा दावा भाजपकडून केला जातो. तर हे सरकार पाच वर्ष टिकणार असा प्रतिदावा महाविकास आघाडीकडून केला जातो. ईडीच्या धाडी, पावसाळी अधिवेशन, मराठा आणि ओबीसी आरक्षण अशा मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला घेरलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या गुप्तभेटींना महत्त्व आहे.

कोण, कुणाला आणि कधी भेटलं?
शरद पवार आणि अमित शाह भेट

दोन महिन्यांपूर्वी शरद पवार आणि अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट झाल्याचं गुजरातच्या वर्तमानपत्रानं दिलं होतं. ही गुप्त बैठक होती, असंही त्यात म्हटलं होतं. त्यामुळे देशभर एकच खळबळ उडाली होती. पवार आता काय मास्टर स्ट्रोक मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादीने अशा प्रकारची भेटच झाली नसल्याचं सांगत भेटीचं वृत्त फेटाळून लावलं होतं. पण अमित शहांनी संदिग्ध विधान करून या भेटीच्या चर्चांना फोडणी दिली होती. या भेटीचा तपशीलही गुलदस्त्यातच राहिला होता.

मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जून महिन्यात राज्याचं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांच्या भेटीला गेले होते. या शिष्टमंडळाने मोदींशी पावणे दोन तास चर्चा केली. या पावणे दोन तासातील अर्धा तास मोदी-ठाकरे यांची बंददाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना या एकांतातील भेटीबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा मी मोदींनाच भेटायला गेलो होतो. नवाज शरीफांना भेटायला गेलो नव्हतो, असं उत्तर ठाकरेंनी दिलं. मोदी आणि आमचं नातं घट्ट असल्याचंही ते म्हणाले.

शिवसेना-राष्ट्रवादीची गुप्त बैठक?
महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याच्या घडामोडी सातत्याने समोर येत आहेत. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर नवी माहिती समोर आली होती. सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली सुरु असल्याचं सुरु आहे. मंगळवारी 29 जून रोजी गुप्त बैठक झाली. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते.

फडणवीस-शाहांच्या भेटीत मोदीही सहभागी
महाराष्ट्राच्या राजकारणात गुप्त बैठकींचा सिलसिला सुरु असल्याचं दिसतंय. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीची चर्चा सुरु असताना, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही गुप्त बैठकीची माहिती 2 जुलै रोजी समोर आली होती. देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची 20 मिनिटे चर्चा झाली.

शरद पवार- देवेंद्र फडणवीस भेट
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 31 मे रोजी शरद पवारांची भेट घेतली होती. शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते. स्वत: फडणवीसांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती.

शरद पवार-प्रशांत किशोर यांची भेट  
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तीन वेळा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. आधी मुंबईत आणि त्यानंतर दोनवेळा दिल्लीत या भेटी झाल्या होत्या. या भेटी थोड्या थोडक्या नव्हत्या तर दोन ते तीन तासांच्या होत्या. या भेटीत 2024ची लोकसभा निवडणूक, देशपातळीवर विरोधी पक्षाचा चेहरा कोण असणार, बिहार, पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील फॅक्टर, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोट बांधणे, बंगाल मॉडेल आणि मविआ मॉडेल देशभर लागू करणे आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

एकनाथ खडसे – शरद पवार भेट
देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जळगावात दाखल झाले. जळगावात ते थेट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गेले. फडणवीस सुमारे अर्धा तास खडसेंच्या घरी होते. त्यावेळी खडसे मुंबईत होते. यावेळी फडणवीसांनी खासदार रक्षा खडसे यांच्याशी पक्षबांधणी संदर्भात चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं असतानाच खडसे यांनी मुंबईत शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

Exit mobile version