Site icon लोकाशा-बंब न्यूज

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहेत. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु आहे. दरम्यान कारवाई दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत, शिवाय ते मुंबईतही नसल्याचं कळतं. अनिल देशमुख दिल्लीत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणात अनिल देशमुख यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आज (25 जून) ईडीने त्यांच्या नागपुरातील घरात छापेमारी सुरु केली आहे. ईडी वेगवेगळे कनेक्शन या प्रकरणात तपासू पाहत आहे.
आज सकाळी आठ ते सव्वाआठच्या सुमारात या कारवाईला सुरुवात झाली. अतिशय गुप्तता या कारवाईबाबत बाळगण्यात आली. नागपूर पोलिसांनाही याची कल्पना नव्हती. या छापेमारीदरम्यान ईडीसोबत पॅरामिलिटरी दलाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. यात महिला कर्मचाऱ्यांचाही मोठा समावेश आहे. या कारवाईसाठी एवढी मोठी सुरक्ष का आणली असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
दरम्यान महिन्याभरापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित तीन व्यक्तींच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. नागपुरातील शिवाजीनगर, न्यू कॉलनी आणि जाफरनगर परिसरात एकाच वेळी ईडीच्या विविध पथकांनी 25 मे रोजी कारवाई केली होती. सागर भटेवारा, समित आयजॅक्स आणि कादरी बंधू यांच्या ठिकाणांची ईडीने झाडाझडती केली होती.

Exit mobile version