Site icon लोकाशा-बंब न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा ; हा तर ओबीसींवर घोर अन्याय – पंकजाताई मुंडे, निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाणार

मुंबई । दिनांक २२।
राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार सह पाच जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणं हा तर ओबीसींवर घोर अन्याय आहे असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर या ५ जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे, यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंकजाताई म्हणाल्या की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना या निवडणुका जाहीर होणं हा ओबीसींवर घोर अन्याय आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही असे वक्तव्य राज्य सरकारमधील मंत्र्यांनी देखील केले होते. आम्ही तर याविरूध्द न्यायालयात धाव घेणार आहोत. तथापि,राज्य शासनाने न्याय देण्याची भूमिका तत्काळ घेण्याची गरज आहे. राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत या निवडणुका न घेण्याची भूमिका मांडण्याबरोबरच आमच्या समवेत कोर्टातही धाव घ्यावी असे त्या म्हणाल्या.

Exit mobile version