Site icon लोकाशा-बंब न्यूज

फ्रंटलाईन वर्कर” आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज आघाडी सरकारचा जाहीर निषेध-राजेंद्र मस्के “गरज सरो वैद्य मरो” राज्यसरकारची भूमिका लज्जास्पद



बीड प्रतिनिधी
आज बीड येथे आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीशी जीवाच रान करून सामना करणाऱ्या निष्पाप आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. “गरज सरो आणि वैद्य मरो” हि राज्यशासनाची भूमिका निष्पाप कर्मचाऱ्यांसाठी घातक ठरल्याचे समोर आले आहे. न्याय हक्कासाठी दोन मिनिटे वेळ मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या आघाडी सरकारचा बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केला आहे.
आज बीड येथे कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रण आणि जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री धनंजय मुंडे आले होते. कोरोना आपत्ती काळात केलेल्या सेवाकर्तव्यपुर्तीची दखल घेऊन कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामाऊन घ्यावे या मागणीसाठी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी मंत्री महोदयांकडे निवेदन देण्यासाठी दोन मिनिटांची वेळ मागितली होती परंतु या कर्मचाऱ्यांना वेळ तर दिलीच नाही उलट लाठीचा प्रसाद देण्यात आला. हि घटना अत्यंत निंदनीय असून सेवा वृत्तीने काम करणाऱ्या तरुण मुला-मुलींवर अन्याय करणारी आहे. अत्यंत कठीण प्रसंगात जीवाची पर्वा न करता काम करणारे तरुण स्वतःच्या भवितव्यासाठी सरकारकडे टाहो फोडत असतील तर सरकार मधील मंत्र्यांनी त्यांच्या पाठीवरून शाबासकीचा हात फिरवण्याची गरज होती. कोरोना लाट ओसरू लागली की कर्मचाऱ्यांना पाठ दाखवण्याची सरकारची वृत्ती कृतघ्नतेची आहे. काही झाले तरी राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना शासकीय सेवेत सामाऊन घेण्यासाठी उपाययोजना करावी अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा राजेंद्र मस्के यांनी दिला आहे.

Exit mobile version