Site icon लोकाशा-बंब न्यूज

अभूतपूर्व रास्तारोकोच्या माध्यमातून ओबीसी समाजाने व्यक्त केला राजकीय आरक्षणाच्या निर्णयाविरोधात आक्रोश! ओबीसींच्या हक्काच्या राजकीय आरक्षणासह इतर मागण्या मान्य न झाल्यास जुलैमध्ये भव्य मोर्चा काढणार – अॅड.सुभाष राऊत

बीड / प्रतिनिधीओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पुर्ततेअभावी स्थगित करण्यात आले आहे. आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या आदेशानुसार गुरुवार दि.१७ जून २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास चौक, जालना रोड, बीड येथे भव्य आक्रोश आंदोलनाचा एक भाग म्हणून अभूतपूर्व  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ओबीसी राजकीय आरक्षणाचे लाभार्थी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांच्यासह ओबीसी समाजातील विविध संघटना आणि समता परिषदेचे पदाधिकारी व समता सैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी बोलताना समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करून ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना व अन्य मागण्या मान्य न केल्यास येत्या जुलै महिन्यात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.राज्यातील पाच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण विरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील  २७ महानगरपालिकेच्या एकूण २७३६ जागांमधून ७४० जागा कमी होत आहेत. १२८ नगरपंचायतीं व २४१ नगरपालिकामधल्या ७४९३ जागांपैकी २०९९ जागा कमी होणार आहेत. ३४ जिल्हापरिषदेतील २००० जागांपैकी ५३५ जागा तर ३५१ पंचायत समितीमध्ये ४००० जागांपैकी १०२९ जागा कमी होणार आहेत २७७८२ ग्रामपंचायत मध्ये अंदाजे १,९०,६९१ जागांपैकी ५१४८६ जागा ह्या ओबीसी समाजाच्या कमी होत आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा कोणताही परिणाम हा नोकरी अथवा शैक्षणिक आरक्षणावर होणार नसला तरीही राजकीय आरक्षण रद झाले आहे. याचा परिणाम फक्त राज्यावरच नाही तर सर्व देशात होणार आहे. यामुळे आता सर्व ओबीसी संघटनांनी एकत्रित लढा देण्याची गरज आहे.तसेच आरक्षणाच्या प्रश्नावर लोकांच्या मनात संभ्रम आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करून लोकांची जनजागृती करण्याची गरज आहे असेही अॅड. सुभाष राऊत म्हणाले.ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी समता परिषदेने दिलेल्या आंदोलन करण्याच्या हाकेला ओबीसी राजकीय आरक्षणाचे लाभार्थी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांच्यासह ओबीसी समाज बांधव आणि समता परिषदेच्या पदाधिकारी व समता सैनिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आजचे आक्रोश रास्ता रोको आंदोलन यशस्वी केले. सदरील आंदोलन शासन आणि कोरोना महामारी नियमांचे पूर्णतः पालन करून लोकशाही मार्गाने करण्यात आले असून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात आला होता.या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा बंजारा समाजाचे नेते प्रा. पी. टी. चव्हाण, मुस्लिम समाजाचे नेते जे.डी. शहा, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा. ईश्वर मुंडे, परीट समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश जगताप, सोनार समाजाचे नेते अॅड. संदीप बेदरे, युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. विष्णू दादा देवकते, गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय गुरव, गुरव समाजाचे नेते गणेश पुजारी, मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष रफिक बागवान, रासपाचे नेते मतकर सर, धनगर समाजाच्या महिला आघाडीच्या नेत्या मीनाताई देवकते, ओबीसीच्या नेत्या नंदाताई सारुक, नाभिक समाजाचे नेते धनंजय वाघमारे, मनसेचे नेते सदाशिव बिडवे, राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष रमेश पवार, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन साखरे, बीड शहराध्यक्ष निखिल शिंदे, नितीन राऊत, धनंजय काळे, धनगर समाजाचे नेते भाई दत्ता प्रभाळे, बाबा घोडके, अजय शिंदे, अविनाश उगले, राम कटारे, अजय कोकाटेयांच्यासह बीड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
*चौकट*
*तब्बल एक तास महामार्गावरील वाहतूक झाली ठप्प!*समता परिषद आणि ओबीसी समाजातील विविध संघटनांच्यावतीने आज धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड बायपास जवळील चौकात करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे जालना रोड, बीड रोड आणि बायपासवरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती. यामुळे महामार्गाच्या सर्वच बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. कसलाही गोंधळ न होता संपन्न झालेल्या या रास्ता रोको आंदोलनात पोलीस प्रशासनाने देखील सहकार्य केल्याबद्दल समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version