Site icon लोकाशा-बंब न्यूज

स्वाराती रुग्णालयातील ऑक्सिजन पाईपलाईनच्या कामात मोठा भ्रष्टाचार,आ. नमिता मुंदडांचा आरोप; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी

अंबाजोगाई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाचा या काळातील विविध कामातील भ्रष्टाचार आणि अनियमिततेची अनेक सुरस प्रकरणे बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयातील मेडिसिन विभागाच्या ईमारतीमध्ये कोविडच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या ऑक्सिजन पाईपलाईनच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याचा आरोप आ. नमिता मुंदडा यांनी केला आहे. एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे काम असूनही ई-टेंडर न काढताच दिले, टेंडरमध्ये नमूद केल्यापेक्षा अधिक दर लावण्यात आले. तसेच जीएसटी देखील अतिरिक्त भरण्यात आला असून यातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला. याप्रकरणी आ. मुंदडांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पुराव्यांसह पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.

ई-टेंडर न काढताच काम दिले

आ. मुंदडा यांनी नमूद केले आहे की, औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालय येथील दि. ०५ जून २०२० ची ई-टेंडर ची ऑर्डर आहे. त्या ऑर्डरवरच औरंगाबाद येथील एस.जी. सर्जिकल या कंपनीस स्वराती रुग्णालय येथे ई-टेंडर च्या दराने एक कोटीच्या वरचे काम ई-टेंडर न काढता दिले आहे. त्या टेंडरमध्ये ०५ क्रमांकाच्या वस्तूची किंमत ई-टेंडर दराने १,४५० रुपये आहे. मात्र, एस.जी. सर्जिकल यांनी स्वा.रा.ती. रुग्णालय यांना लेटरपॅडवर २,५५० रुपये लावले असून बिलही त्या रकमेचे दिले आहे.

३ हजार ऐवजी दिड हजार लिटरचा टॅंक बसवला

टेंडर मध्ये व्हँक्युम पंप ०५ एच.पी.दोन नग, व्हँक्युम रिसिव्हर टॅंक ३ हजार लिटर ०१ सेट सहित किंमत ५,५८,४३३ एवढी आहे. मात्र, बिलामध्ये प्रत्यक्षात व्हँक्युम पंप ०५ एच.पी. दोन नग ५,५८,४३२ आणि रिसिव्हर टॅंक दिड हजार लिटरची किमंत १,७५,००० हजार रुपये वेगळी लावली आहे. टेंडरमध्ये ३ हजार लिटरचा टॅंक असताना प्रत्यक्षात दिड हजार लिटरचा टॅंक बसवून ७,४०,७३२ रुपयांचे एकूण बिल दिले आहे.

अतिरिक्त जीएसटी लावला

टेंडर मधील साहित्याचे सर्व रेट/कोटेशन मधील रेट हे जीएसटी अंतर्भूत करून आहेत. मात्र गंभीर बाब म्हणजे प्रत्यक्षात बिल करताना जीएसटी अतिरिक्त लावला आहे. औरंगाबाद रुग्णालयातील रेट हे सर्व करासहित असल्याचे ई-निविदेमध्ये आहे. मग स्वा.रा.ती. रुग्णालयात अतिरिक्त जीएसटी लावण्याचे कारण काय? अतिरिक्त जीएसटी लावला म्हणजे प्रत्येक वस्तूची किमत वाढली. ई-निविदेमध्ये सर्व करासहित असे स्पष्ट दर्शवले आहे व अतिरिक्त रक्कम मिळणार नाही असे लिहिले असताना मात्र अतिरिक्त जीएसटी लावण्यात आला ही बाब गंभीर आहे.

कामास प्रचंड विलंब

वरील सर्व कामे ही मेडिसिन विभागाच्या अ-ईमारतीची असून या कामाचे ई-टेंडर होणे गरजेचे होते. तसेच सदर कामे २० दिवसात करणे आवश्यक असताना त्यासाठी तब्बल सहा महिने लावले. सदरील सर्व कामे एक कोटी रुपयांच्या वरची आहेत. त्यातील २८ लक्ष रुपयांचे बिल पेमेंट करण्यात आले आहे. आणखी ८८ लक्ष रुपयांचे काम करण्याचे राहिले आहे. त्याही कामात असाच प्रकार रेट बाबत झालेला आहे. अशा प्रकारे कोविड साथीच्या काळातही स्वाराती रुग्णालयात अधिष्ठाता व रुग्णालय प्रशासनाने संगनमताने भ्रष्टाचार करत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. कोरोना काळातील ईतर खरेदीतही असाच भ्रष्टाचार होत आहे. तसेच, आणखी ब-ईमारती मध्ये ऑक्सिजन पाईपलाईन व ऑक्सिजन प्लांट पासून जोडणीचे काम आहे. त्याचेही काम ई-टेंडर न काढता याच एस.जी. सर्जिकल यांनाच देण्याचे प्रस्तावित आहे. तरी उर्वरित काम करावयाचे असेल तर ई-टेंडर काढावे अशी विनंती आ. मुंदडा यांनी अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.

आमदारांनीच स्वतः पुरावे सादर करत स्वाराती रुग्णालयात कोरोनाच्या आडून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. भविष्यातही कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि अनियमिततेची अनेक सुरस प्रकरणे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. या आरोपांवर ते काय स्पष्टीकरण देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Exit mobile version