बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : सन 2021-22 साठी बीड जिल्हा बँकेस खरीप हंगामासाठी 208 कोटी व रब्बी हंगामासाठी 52 कोटी असे एकुण 260 कोटींचे उदिष्ट देण्यात आले आहे. बँकेने दि. 29 मे अखेर खरीप हंगामात 619 सभासदांना 4 कोटी 13 लाख इतके कर्ज वाटप केले आहे. बँकेने जमाबंदी आयुक्तालयाशी करार करुन शेतकर्यांना डिजीटल स्वाक्षरीत 7/12 व 8 अ संगणकीय प्रणालीव्दारे तालुका शाखा स्तरावर सुविधा उपलब्ध करुन दिली असून आता डिक्लरेशन (इकरार) पत्रावर तलाठी यांची स्वाक्षरी घेण्याची सुध्दा आवश्यकता नसल्याच्या सुचना सर्व शाखांना दिल्या आहेत, पिक कर्जासोबत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जिवन ज्योती विमा योजनेचा लाभ शेतकर्यांना देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यापुढे बँकिंग प्रणालीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करुन शेतकरी सभासद व नवीन ठेवीदारांना डेबिट कार्ड दिले जाणार असून कर्जाची नोंद सीबिलवर घेण्याचा निर्णय सुध्दा प्राधिकृत अधिकारी समितीने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष अविनाश पाठक यांनी देवुन खरीप आढावा बैठकीमध्ये जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व शासनाने जिल्हा बँकेस पिक कर्ज वाटपाचे दिलेले उदिष्ट पुर्ण करणार असल्याचे त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले.
बँकेच्या नुतन प्राधिकृत अधिकारी समितीचे अध्यक्ष म्हणुन अविनाश पाठक, अपर आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद , प्रमोद कर्नाड, माजी व्यवस्थापकीय संचालक , महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि . , मुंबई , सनदी लेखापाल जनार्धन रणदिवे , अशोक कदम , सहा.निबंधक, सहकारी संस्था , लातुर , अॅड . अशोक कवडे यांनी पदभार स्विकारुन कामकाजास सुरुवात केली आहे. खरीप हंगामाच्या पिक कर्ज वाटपासह बँकिंग प्रणाली बाबत धोरणात्मक निर्णय प्राधिकृत अधिकारी समितीने घेतले आहेत. खरीप हंगामाचे पिक कर्ज वाटप करतांना उद्दिष्ट पुर्ती सह शेतकर्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. यामध्ये जीवन ज्योती विमा योजनेत शेतकरी सभासद वयाच्या 18 ते 50 वर्षांपर्यंत वार्षिक 330 रुपये तसेच प्रधानमंत्री सुरक्षा योजनेच्या सभासदांचे वय 18 ते 70 वर्षे असून या योजनेत सहभागी होणार्या शेतकर्यांना वार्षिक हप्ता रुपये 12 असुन विमा धारकाचा अपघाती मृत्यु झाल्यास वारसास दोन्ही योजने मधून पात्र विमा धारकाला रु.2.00 लाख एवढी विमा रक्कम मिळणार आहे.या विमा योजनेचा लाभ कर्ज वाटप करतेवेळी शेतकर्यांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बँकेच्या प्राधिकृत अधिकारी समितीने ठेवीधारकांना बँकेत ठेवी ठेवण्याचे अवाहन केले असून बँकेतील रुपये 5.00 लाखा पर्यंतच्या ठेवीला विमा संरक्षण असल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी समितीचे अध्यक्षांनी देवून नविन ठेवीदारांना बँक बँकींग व्यवहारासाठी डेबिट कार्डसह एसएमएस सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. यापुढे कर्जदारांचा डाटा सीबीलवर अपलोड करण्यात येणार असून कर्जदारांनी सीबील क्रेडीट खराब होवू नये याची दक्षता घेण्यासाठी थकीत कर्जाचा भरणा तातडीने करण्याचे अवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे. बँकेच्या दैनंदिन कारभारात पारदर्शकता व विश्वासहर्ता निर्माण करण्यासाठी नुतन प्राधिकृत अधिकारी समिती तत्पर असल्याचे ही त्यांनी शेवटी सांगितले. याप्रसंगी समिती सदस्य अशोक कदम, सहा.निबंधक, सहकारी संस्था, लातुर, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी शरद ठोंबरे हे उपस्थित होते.