Site icon लोकाशा-बंब न्यूज

वारे पोलिस…! 17 वर्षाच्या लेकीचे झाले अपहरण अन् शोधण्साठी पोलिसांनी मागितले 40 हजार रुपये


बीड, 29 मे : 17 वर्षाच्या मुलीची बेपत्ता झाल्याची व अपहरण केल्याची तक्रार देणार्‍या वडिलांना मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनीच 40 हजार रुपये मागितल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये घडला आहे. फिर्यादी कडे पैशाची मागणी करणार्‍या पोलिसांच्या मध्यस्थीच्या कॉल रेकॉर्डिंग समोर आल्या आहेत. यामुळे बीड पोलीस खात्याच्या माणुसकीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. तसंच कायद्याचे रक्षक असणार्‍या पोलिसांकडून लुटले जात असेल तर न्याय कोणाकडे मागावा, या प्रकरणी पीडित वडिलांनी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर तसेच पोलीस एजंट हनुमान अर्जुन फपाळ यांचा उल्लेख तक्रारीत केला आहे.
माजलगाव तालुक्यातील बेलोरा येथील भगवान आसाराम फपाळ यांची अल्पवयीन 17 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. या संदर्भात 25 मे रोजी दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार घेतल्यानंतर पोलिसाची भेट घेतली. पोलिसाच्या मध्यस्थी व करवी मुलीचा तपास लावून मुलीला परत आणायचे असेल तर साहेबाला 40,000 खर्च द्यावा लागेल, असे सांगितले. त्यावेळी इकडून तिकडून करून 15 हजार रुपये हनुमान नावाच्या मध्यस्थीकडे दिले. पण चार-पाच दिवस गेले तरी तपासाची स्थिती मात्र शून्यावरच होती म्हणून मुलीच्या वडिलांनी ठाण्यात चौकशी केली. परंतु, पूर्ण रक्कम न दिल्याने त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही मग पोलीस एजंट हनुमानला विचारणा केली तर 25000 दिल्याशिवाय तपास लागू शकत नाही, असे सांगितले. यावेळी भगवान फपाळ यांच्या पायाखालची वाळू सरकली. अगोदरच मुलगी बेपत्ता असल्याने मानसिक तणावात असताना अशा पद्धतीने मागणी करणार्‍या पोलिसांना माणुसकीचे थोडी तरी भान आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला. अखेर पीडित वडिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून सविस्तर लेखी तक्रार दाखल करून माझ्या मुलीचा तपास लावा आणि पोलीस एजंट हनुमान व स.पो.नि गव्हाणकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. ’आम्ही दिंद्रुड पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर येथील पोलिसांच्या मध्यस्थीने आम्हाला पैशाची मागणी केली जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत तुमची मुलगी तुम्हाला वापस मिळणार नाही, आम्ही कसेबसे पैसे गोळा करून माझ्या सासर्‍याकडे त्यांना दिले. नंतर ते चहा पाण्यासाठी दहा हजार रुपये द्या, गाडी भाड्यासाठी पंधरा हजार रुपये द्या, अशी मागणी करत आहेत. आठ दिवस होऊन गेले पण अजून मुलीचा शोध लागला नाही मात्र पोलीस आमच्याकडून पैसे मागत असल्याने आम्ही गरीब आहोत पैसे कुठून आणून द्यायचे, असं पीडित मुलीच्या आईने सांगितलं ’आमची मुलगी बेपत्ता झालेले आहे, तिचे काय झाले काय माहित नाही मात्र पोलिसात तक्रार दिली. दिंद्रुड पोलीस स्टेशनचे मोठे अधिकारी हे 40 हजार रुपये मागत आहेत. माझ्या मुलांनी त्यांना 25 हजार रुपये घेऊन दिले मात्र आणखी पैसे आणून द्या, अशी मागणी ते करत आहेत. मात्र अद्यापपर्यंत आमच्या मुलीचा शोध लागला नसून ती कुठे आहे कशी आहे, अशी चिंता आजोबा बाबुराव फफाळ यांनी व्यक्त केली. घडलेला प्रकार गंभीर असून मुलीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना पोलिसांकडून अशा पद्धतीने गरीब कुटुंबाकडे पैशाची मागणी करणे चुकीचे आहे या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई केली जावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर त्यांच्याशी या प्रकरणासंदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला या प्रकरणावर मला काहीच बोलायचे नाही असे सांगून निघून गेले. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना विचारणा केली असता तक्रारीवर जी चौकशी करून कारवाई केली जाईल असा फोनवरून सांगितले.

Exit mobile version