Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्याचा कृषि विभाग शेतकर्‍यांच्या बांधावर



बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. याअनुषंगानेच जिल्ह्याचा कृषी विभाग सध्या शेतकर्‍यांच्या बांधावर आल्याचे पहायला मिळत आहे. 25 मे रोजी जिल्ह्यात कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी 651 प्रात्यक्षिकाव्दारे बियाणे उगवण क्षमता आणि बीज प्रक्रियेचे महत्व शेतकर्‍यांना पटवून सांगितले आहे.
पिक उत्पादकता वाढविण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये विविध मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. विविध माध्यमाद्वारे प्रचार प्रसिद्धी करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानुषंगाने बीड जिल्ह्यात दि. 25 ते 29 मे 2021 या कालावधीत बियाणे उगवण क्षमता व सोयाबीन बीज प्रक्रिया मोहीम, विनानुदानित तत्वावर बीजप्रक्रिया मोहीम, रुंद सारी वरंबा (बी.बी.एफ.) तंत्रज्ञान वापर मोहीम, कापुस उत्पादकता वृद्धी अभियान, एक गाव एक वाण मोहीम, 10 टक्के रासायनिक खत बचत मोहीम या मोहिमांचे उपक्रम हाती घेण्याचे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. त्या नुसार दि. 25 मे 2021 व 26 मे 2021 रोजी बीड जिल्ह्यात शेतकार्‍यांच्या बांधावर जाऊन बियाणे उगवण क्षमता व सोयाबीन बीज प्रक्रिया मोहीम, विनानुदानित तत्वावर बीजप्रक्रिया मोहीम यांचे कृषि विभागातील मंडळ कृषि अधिकारी , कृषि सहाय्यक , कृषि पर्यवेक्षक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक , सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषि मित्र, कृषि ताईंच्या सहाय्याने राबविण्यात आली. या मोहिमांचे संनियंत्रण तालुका कृषि अधिकार्‍यांनी केले तर जिल्हास्तरीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर भेटी देऊन मार्गदर्शन केले. सोयाबीन बियाण्यावर अनावश्यक खर्च टाळण्यासाठी त्यामुळे घरचे उपलब्ध बियाणे पेरणीसाठी वापरण्याकरिता प्रबोधन करण्यात आले व सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणीची प्रात्याक्षिके घेण्यात आली. उगवण क्षमता 60 टक्के आल्यास 35 किलो प्रती एकरी व 70 टक्के आल्यास 30 किलो प्रती एकरी बियाने वापरण्याचा सल्ला कृषि विभागामार्फत देण्यात आला. निरोगी पिकासाठी बीजप्रक्रिया महत्वाची असल्याने जिल्ह्याभरात बीज प्रक्रिया प्रात्याक्षिके घेण्यात आली. यामुळे जमिनीतून व बियानाद्वारे पसणार्‍या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो, बियाण्याची उगवण क्षमता वाढते, रोपे सतेज व जोमदारपने वाढतात, उत्पादनात वाढ होते, बीजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो व त्यामुळे कीड रोग नियंत्रनाची ही किफायतशीर पद्धत असल्याचे महत्व शेतकार्‍याना प्रत्यकाशीकद्वारे पटवून देण्यात आले. बियाणे उगवण क्षमता चाचणी कशी करावी ? आपल्या घरातील सोयाबीन बियाण्यांचे प्रातिनिधिक करेल असे बियाणे निवडून ओल्या गोणपाटावर दहा ओळी उभ्या व दहा ओळी आडव्या अशा शंभर बिया ठेवून गोणपाट व्यवस्थित बांधून, असे गोणपाट सावलीच्या ठिकाणी ठेवावे व पुरेसा ओलावा राहील याची दक्षता घ्यावी व 6 व्या दिवशी सदरील निरीक्षण घ्यावे. 100 पैकी किमान 70 बिया उगवून आल्यास सदरील बियाणे पेरणीसाठी योग्य असल्याचे समजावे, जिल्ह्यात कृषी विभागाने 25 मे रोजी उगवणक्षमतेबरोबरच बीज प्रक्रिया अशी प्रत्येकी 651 प्रात्यक्षिके घेतली, यावेळी 5017 शेतकर्‍यांची उपस्थिती होती. परळीतील हसनाबाद येथे सोयाबीन बियाणे उगवणक्षमता आणि सोयाबिन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक समयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी मार्गदर्शन केले, यावेळी गोविंद कोल्हे कृषी उपसंचालक बीड, श्री गरांडे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक बीड, श्री थोटे कृषी पर्यवेक्षक इतर कृषी सहायक तसेच महिला शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड श्री सुभाष साळवे यांनी जिल्ह्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी पेरणीपूर्वी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी बीज प्रक्रिया करून पेरणी करावी, असे आवाहनही यावेळी साळवे यांनी केले आहे.

Exit mobile version