Site icon लोकाशा-बंब न्यूज

मराठी अप्सरेसाठी बीडच्या नटरंगाचा राडा

पुणे : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिच्या एका चाहत्याने तिच्या पुण्यातील (Pune) घरात घुसून थेट तिच्या वडिलांवर चाकू हल्ला (Knife AttacK) केल्याची धक्कादायक घटना आज (25 मे) सकाळी घडली. या संपूर्ण प्रकारामुळे सोनाली आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, हे कृत्य का केलं अशी जेव्हा आरोपीला विचारणा करण्यात आली तेव्हा तो म्हणाला की, ‘जसं तिचं लग्न जमल्याचं समजलं ना साहेब… मी दोन-दोन दिवस भाकर खाल्लेली नाही. फक्त तिला भेटायचं होतं मला.’

पाहा सोनालीच्या घरात घुसणाऱ्या ‘त्या’ चाहत्याचं म्हणणं काय
‘मी सोनालीवर गेल्या अनेक वर्षांपासून प्रेम करतो. सोनालीने लग्न केलेलं नाही. तिनेच जाहीर केलेलं आहे साहेब. लग्न करायचं आहे केलेलं नाही. पण तिथं तिसरी लाट असल्यामुळे तिने तिथे जाऊन फक्त सिंदूर आणि मंगळसूत्र घातलं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार सिंदूर आणि मंगळसूत्र नाही त्याला सप्तपदी लागते. त्यामुळे तिने असं काही जाहीर केलेलं नाही. ती जुलैमध्ये करणार असं ती म्हणाली होती. तारीख वाढवली आहे तिने. म्हणून मी आलो होतो.’

‘मी मूळचा बीडमधील आहे. मी एका बेकरीत काम करतो. मी इथे सोनालीला भेटायला आलो. मी इथे पुण्यात डिसेंबर महिन्यात कामाला आलो होता. तेव्हा आल्या-आल्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच मी इथे आलो होतो निगडीत. तिच्यासाठीच आलो होतो मी, तिला भेटण्यासाठी. जसं तिचं लग्न जमल्याचं समजलं ना साहेब… मी दोन-दोन दिवस भाकर खाल्लेली नाही. मी इतका बैचेन झालो होतो. एकदा बोलावं तरी, भेटावं तरी असं मला वाटायचं. त्यामुळे मला गावाकडं दम निघेना म्हणून मी आलो इकडे निघून.’ ‘मी इकडेच राहिलो. म्हटलं कधी जर इकडे आली तर मला तिला भेटता येईल. नेमकी ती यायची आणि मी आलो की, गायब असायची. तिचे घरचे काय मला तिला भेटून देत नव्हते. मग मी ठरवलं की, बरेच दिवस झाले माझी आणि तिची काही भेट होईना. मग काल रात्री त्यांच्या घरामध्येच घुसलो मी. त्यांच्या घराला असणाऱ्या पाईपावरुनच चढलो मी. सकाळ होईपर्यंत मी पहिल्या मजल्यावरच बसून राहिलो. मी पहाटे-पहाटे गेलो होतो तिच्या घराजवळ. तिथं कुणीच नव्हतं.’

‘सोनाली दुबईत हे माहिती होतं. पण फोनवर बोलता तर येईल ना. त्यांच्यासमोर व्हीडिओ कॉलवर बोलता वैगरे येईल ना. म्हणून गेलो होते. मोबाइल नंबर कसा देतील ते मला.’ ‘चाकू माझ्याकडे खूप दिवसांपासून आहे. मिरची पावडर स्प्रे वैगरे हे मी माझ्या सुरक्षेसाठी आणलेलं आहे. कारण मी कुठेही एकटा वैगरे झोपतो ना. त्यामुळे हे सगळं घेतलं होतं.’
‘मी दोरीपण सोबत आणली होती. त्यांच्या घरावर चढण्यासाठी आणली होती. पण मला ती दोरी पुरली नाही. त्यामुळे थेट त्यांच्या घरी नाही जाता आलं. म्हणून सगळा गोंधळ झाला. डायरेक्ट त्यांच्या घरी गेलो असतो तर डायरेक्ट त्यांच्याशी बोललोच असतो. पण मी दुसऱ्याच घरात गेलो आणि ती बाई घाबरली मला बघून. तिला बघून मी पण घाबरलो. मी लागलो पळायला. मला सोनालीच्या वडिलांनी आणि भावाने एवढं नाही मारलं. पण एक चांगला असा तब्येतीचा माणूस होता आणि त्यांचा वॉचमन. दोघं बेदम मारत होते मला. मी सरेंडर झालो तरी मारत होते मला.’

‘मला जर चाकू मारायचा असता तर खूप जणांना मारला असता. सोनालीच्या वडिलांना चाकू कसा लागला मलाच माहिती नाही. मी जाणूनबुजून चाकू मारला असता तर किती लागायला पाहिजे होता. पूर्ण बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही आहेत. तुम्ही दाखवा मला की मी कुणावर हल्ला केला आहे म्हणून. मी फक्त माझ्या सुरक्षेसाठी तो चाकू बाहेर काढला होता. कारण खाली सगळी माणसं जमा झाली होती.’ असं म्हणत आरोपी संजय शेटगे याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, या घडल्या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर आता रितसर कारवाई करण्यात येणार असल्याचं समजतं आहे.

Exit mobile version