परळी वैजनाथ दि २५ ( लोकाशा न्युज ) :-
शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भीक मागणारे एक वयोवृद्ध भिक्षुकाची जमा केलेली पुंजी सोमवारी (ता.२४) रात्री अचानक हरवली. आयुष्यभर भीक मागून आपली जमवलेली पुंजी गहाळ झाल्याने हतबल झालेल्या भिक्षुकाने शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे यांना सांगताच त्यांनी डी बी शाखेच्या सहायाने तपासाची चक्रे फिरवून मंगळवारी (ता.२५) अवघ्या तीन तासात १ लाख ७२ हजार २९० रुपयांचा छडा लावून त्या वयोवृद्ध भिक्षुकाला परत दिले. शहर पोलिसांच्या ह्या धडाकेबाज कारवाईचे शहरात अभिनंदन होत आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बाबूराव नाईकवाडे (वय ८०) हे घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने भीक मागून आपले जिवन जगत होते. बाबूराव नाईकवाडे यांनी भीक मागून पै,पै जमा केली. परिवारात एक मुलगा,सुन असूनही त्यांचा सांभाळ करत नव्हते. म्हणून इकडून तिकडून कसेतरी आपले उदरनिर्वाह भागवू लागले. जमा केलेले पैसे एका पिशवीत भरून जवळच ठेवले होते. पण सोमवारी सायंकाळी त्यांच्या लक्षात आले की, आपली रोख रक्कम असलेली पिशवी गहाळ झाली आहे. त्यांनी मंगळवारी सकाळी सरळ शहर पोलीस ठाणे गाठले आणि झाला प्रकार त्या ठिकाणचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे यांना सांगितला पालवे यांनी शहर पोलिस ठाण्याचे डीबी शाखाप्रमुख भास्कर केंद्रे यांना तपासकामी मोहिमेवर पाठविले. भास्कर केंद्रेसह मधुकर निर्मळ ( तात्या ), गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे, शंकर बुड्डे आदींनी आपली तपासाची जोरदार चक्रे फिरवली सुरुवातीस पोलीसांना कांही विश्वास बसत नव्हता की ह्या भिकाऱ्याजवळ इतका पैसा आला कुठून आपणच मंदिर ला गेलो की त्याला दहा – दहा रुपये देतो. मात्र भिक्षुकाची तळमळ आणि त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहता पोलिसांना देखील घटनेत सत्यता वाटली. मग मात्र डीबी शाखेचे प्रमुख भास्कर केंद्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जोरदार तपास यंत्रणा हलवली आणि हा भिक्षुक कुठे कुठे जात होता, कुठे कुठे बसत होता, कुठे – कुठे झोपत होता. त्या त्या ठिकाणी जावून चौकशी केली असता आणि अवघ्या तीन तासात या प्रकरणाचा छडा लावीत बाबूराव नाईकवाडे ह्या भिक्षुकाचे गहाळ झालेले तब्बल १ लाख ७२ हजार २९० रूपये एका पिशवीत असलेले हस्तगत केले व त्या भिक्षुकास फोन करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले व भीक मागून जमा केलेली आयुष्यभराची कमाई सन्मानाने स्वाधीन केली. यावेळी बाबूराव यांना पैसे पाहताच अश्रू अनावर आले होते. या कारवाईमुळे
सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे यांच्यासह डि.बी पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे, मधुकर निर्मळ (तात्या), गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे, शंकर बुड्डे, यांचे शहरात अभिनंदन होत आहे.
परळीत भीक मागून जमवुन गहाळ झालेल्या भिक्षुकाच्या दोन लाखांचा पोलिसांनी अवघ्या तीन तासात लावला छडा ,शहर पोलिसांची अभिनंदनीय कारवाई
