शिरूर कासार । दिनांक१८।
नियमित आरोग्य तपासणी, पौष्टिक आहार व मानसिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यास यामुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि शांतीवन चे शहरातील आयसोलेशन (विलगीकरण) सेंटर रूग्णांचे ‘माहेरघर’ बनले आहे. तत्पर रूग्ण सेवेमुळे सर्व सामान्यांना या सेवा यज्ञाचा मोठा आधार वाटत आहे.
जिल्हयातील कोरोना महामारीचे गंभीर संकट लक्षात घेऊन पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे व शांतीवनचे दिपक नागरगोजे यांनी सुक्ष्म लक्षणे असलेल्या कोरोना बाधित रूग्णांसाठी शिरूर कासार येथील सिध्देश्वर इंग्लिश स्कूल येथे १२ मे पासून शंभर बेडचे आयसोलेशन सेंटर सुरू केले आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने परळी पाठोपाठ बीड व शिरूरच्या रूग्णांची सोय व्हावी यासाठी हा सेवा यज्ञ सुरू केला आहे. शिरूरच्या या सेंटर मध्ये सध्या पुरूष २० आणि महिला २८ असे एकूण ४८ रूग्ण उपचार घेत आहेत. स्वतंत्र विलगीकरण कक्षात रूग्णांची संपूर्ण काळजी घेतली जात असून दररोज डाॅ. भोंडवे, डाॅ. खाडे, डाॅ. बडजाते, डाॅ. पगारे आदी तज्ज्ञ डाॅक्टर्सकडून तपासणी व औषधोपचार दिले जात आहेत. रूग्णांना सकाळी चहा, नाश्ता, आयुर्वेदिक काढा, दुपारी व संध्याकाळी पौष्टिक भोजन तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मोड आलेले कडधान्य आहारात दिली जात आहेत. मानसिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यास देखील घेतला जात आहे.
पंकजाताईंच्या वेळोवेळी सूचना
सेंटर मधील रुग्णांच्या सेवेत कुठलीही उणीव भासू नये यासाठी पंकजाताई मुंडे वेळोवेळी कार्यकर्त्यांना सूचना देत असून शांतीवनचे दिपक नागरगोजे हे स्वतः त्याठिकाणी हजर राहून रूग्णांची संपूर्ण काळजी घेत आहेत. या सेंटर मधून रूग्ण ठणठणीत बरा व्हावा यासाठी दोन्ही संस्थेच्या टीम अहोरात्र मेहनत घेत आहे. इथल्या सोयी सुविधेमुळे हे सेंटर रूग्णांना ‘माहेरघर’च वाटत असून सर्व सामान्यांचा ते मोठा आधार बनले आहे.
••••